रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...
भाग दुसरा ...
दिनांक - २८ नोव्हेम्बर २०२० , शनिवार .
बेलपाड्यात पोहचता पोहचता सकाळचे ७ वाजून गेले होते . नाशिक पासून अवघ्या १३० की मी. अंतरासाठी आम्हाला तब्बल ९ तास लागले होते. अवघड ट्रेकची अशी अवघड सुरुवात होईल हे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते. तरीही आमचा ट्रेक होऊ शकेल हाच आनंद मोठा होता.
सूर्य देवता तारामती शिखराच्या आडून वर येऊ पाहत होती. बेलपाडा हे गाव कोकणकड्याच्या अगदी समोर पश्चिमेला वसलेले आहे. त्यामुळे सूर्य दर्शन येथे नेहमी उशीरा होत असते. कोकणकड्याचे दर्शन येथून खूपच विलोभनीय होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग पिंजून पसरलेले होते. लांबच लांब व उंचच उंच पसरलेला हरिश्चंद्र गड छाती दडपून टाकत होता.
आम्ही २३ जण गावात पोहचलो. नैसर्गिक विधी आटोपुन चहा , नाश्ता करून कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. शेत, जंगल तुडवत जाणारा रस्ता पुढे ओढ्याला जाऊन मिळतो . पावसाळ्यात हा ओढा दुधडी भरून वाहतो . तेव्हा या वाटेने जायचे धाडस कोणी करत नाही. ओढा आत्ता कोरडा झाला होता मात्र काही ठिकाणी पाणी साचलेले दिसत होते. या नितळ पाण्यात छोटे मासे मस्त विहार करत होते. आम्ही मोठं मोठे दगड धोंडे ओलांडत पुढे पुढे जात होतो.
![]() |
| धबधब्याची जागा , मागे कोकणकडा |
हरिश्चंद्रगडाचा परिसर फार मोठा आहे. पूर्ण गड फिरायचा दोन तीन दिवस कमी पडतील . या गडाला तीन शिखर आहेत हरिश्चंद्र बालेकिल्ला , तारामती , रोहिदास शिखर यातील तारामती शिखर सर्वात उंच म्हणजे ४८०० फूट आहे. हा गड माळशेजच्या डोंगर रांगेत नगर , पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर स्थित आहे. मात्र गड नगर जिल्ह्यात मोडतो. तर कोकणकडा च्या खालचा भाग ठाणे जिल्ह्यात येतो.
आमचा हा ट्रेक कोकणकड्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या नाळेतून जाणार होता. हिलाच माकड नाळ असे म्हणतात. पूर्वी या ठिकाणी खूप माकड असायची असे स्थनिक सांगतात. ट्रेकिंग चा दांडगा अनुभव असल्याशिवाय या नाळेच्या वाटेला शक्यतो कोणी जात नाही. तसेच आरोहन चे तंत्र अवगत असल्या शिवाय जाणे धोक्याचे आहे.
वाटेत एक बंद असलेला वॉटर फॉल येतो याठिकाणी नळीची वाट व माकड नाळ या दोन्ही येऊन मिळतात. पावसाळ्यात दोन्ही बाजूने पाणी एकत्र येऊन मोठा ओढा तयार होतो. हाच ओढा पुढे काळू नदीला जाऊन मिळतो. या भागातून मंगळगंगा व काळू या दोन नद्या उगम पावतात.
पावसाच्या जोरदार प्रवाहा मुळे या नाळा खडक फोडून तयार झाल्या असाव्यात . याच नाळेचा वापर पूर्वी पासून लोक जाण्या येण्यासाठी करत होते. आत्ता रस्ते , दळण वळण चे साधने झाल्यामुळे यांचा वापर बंद झाला आहे. मात्र ट्रेकिंग करणारी मंडळीना सर्व गड किल्ले पाहून झाले की या आड मार्गाचा घाट वाटा खुणावू लागतात.
हरिश्चंद्रगडाला ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्व पण आहे. या किल्ल्यावर यादवांचे राज्य होते तसेच १७५० नंतर मोगलांकडून मराठयांनी हा किल्ला जिंकून घेतला, असा इतिहास आहे.
माकड नाळ बाहेरून इतकी मोठी असेल हे लक्षात येत नाही. पण जसा आपण तिच्यात प्रवेश करतो तसा तिची लांबी आणि भव्यता लक्षात येते. मोठं मोठे दगड ओलांडत आपला मार्ग वर वर जात राहतो. काही ठिकाणी मोठया आकाराच्या खडकवरून चढतांना चांगलाच दम निघतो.
'एकमेका साह्य करू, अवघे चढू माकड नाळ' या प्रमाणे एकमेकाला साथ करत होते. नाळेच्या एका ठिकाणी जिवंत झरा वाहतो त्याचे पाणी अतिशय थंड व चवदार होते. तेथे पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या भरून घेतल्या.
विरुद्ध बाजूला नळीची वाट स्पष्ट दिसत होती . तिच्यावर ऊन पडल्यामुळे त्या मार्गाने चढणारी ट्रेकर मंडळी मुंगी सारखी भासत होती.
वातावरण स्वच्छ असल्याने फोटोची आवड असणाऱ्यांना पर्वणीच लाभली होती.
![]() |
| माकड नाळेतील ७० फुटाचा रॉक पॅच |
मजल दर मजल करत आम्ही एका ७० फुटाचा रॉक पॅच जवळ येऊन पोहचलो. हा टप्पा चढणे तांत्रिक अवजार असल्या शिवाय अवघड आहे. रोप च्या साहय्याने सेट अप लावला गेला. हर्णेस कमरेला बांधून, हेल्मेट घालून एक एक जण दोराच्या साहाय्याने कातळ कडा चढू लागला. या ठिकाणी दगड निसटून डोक्यावर पडण्याची भीती असते म्हणून हेल्मेट घातल्या शिवाय वर चढू नये. आम्हाला हा टप्पा पार पाडायला दोन तास लागले. त्यानंतर साधारण पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही रोहिदास च्या पायथ्याच्या खिंडीत पोहचलो. ही खिंड तारामती व रोहिदास यांना जोडते. ह्या खिंडीत असलेला शेंडी सुळका लक्ष वेधुन घेतो. हा सुळका सर्वात प्रथम स्वर्गीय अरुण सावंत सरांनी १९८४ साली आरोहन केला होता.
तेथे त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या व त्यांना मनोभावे श्रद्धांजली अर्पण केली.
![]() |
| शेंडी सुळका |
आत्ता दुपार चे दोन वाजले होते . आम्ही २३ जणांनी सकाळी ८=३० वाजता चालू केलेली माकड नाळ चढाई दुपारी २ वाजता यशस्वी रित्या पूर्ण केली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते . मनावरचा ताण हलका झाला होता.शेंडी सुळक्याचे वेग वेगळ्या अँगल ने फोटो काढले जात होते. सभोवतालचा नजारा इतका प्रसन्न करणारा होता की मंडळीना जेवणाचा विसर पडला होता. फोटो सेशन झाल्यावर सर्वानी तांदळाच्या भाकरी आणि बटाट्याच्या भाजीवर यथेच्छ ताव मारला .
एव्हाना दुपारचे साडे तीन वाजले होते रोहिदास शिखर चढाई करायचे बाकी होते , वेळ फार कमी राहिला होता. रोहिदास शिखर चढणे घसारा असल्याने जिकरीचे होते . शिवाय अंधार पडायच्या आत परत येणे गरजेचे होते. शेवटी आम्ही १० जणांनी शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. अगदी छोटीशी कसा बसा पाय बसेल इतकी जागा असलेली वाट. थोडासा अंदाज चुकला तर थेट दरी .... अतिशय काळजी पूर्वक चालावे लागत होते. त्यानंतर जंगलातुन वर चढावे लागते. वेळ कमी असल्याने झाडांच्या खोड , फांद्यांचा आधार घेत पळत पळतच वर चढत होतो. पुढे कारवी चे दाट जंगल लागते. वाट अगदी निसरडी खूप दमछाक होत होती. पुढचा टप्पा खडकातून वर जात होता. अनेक रिस्की पॅच चढून एकदाचा रोहिदास शिखर गाठले. समोरचा नजारा देहभान विसरायला लावेल असा होता. सह्याद्रीचे हे विराट रूप डोळ्यात साठवून घेत होतो. अक्षरक्षा फोटो काढायचे विसरून गेलो होतो. शिखरावर उभे राहायला एकदम कमी जागा होती . जोरदार हवा वाहत होती . वातावरण अतिशय प्रसन्न होते . सूर्य मावळतीला निघाला होता. ढगांचा आडून सूर्य किरण खालच्या बेलपाड्यात sun ray shower ने आंघोळ घालत होते. उत्तरेला सीतेचा डोंगर , अजस्र कोकणकडा , नाप्तां , आजोबा या ठिकाणाहून सह्याद्री चे रौद्र भीषण रूप डोळ्याचे पारणे फेडत होते.
![]() |
| रोहिदास वरून दिसणारा नजारा, कोकणकडा, सीतेचा डोंगर, नाफ्ता. |
तर दक्षिणेला उधळ्या, सिंदोळा, निमगिरी, भैरवगड, जीवधन , हडसर, खिरेश्वर, पिपळगाव जोग चे धरण मनमोहक नजारा दिसत होता. या ठिकाणाहून निघूच नये असे वाटत होते . पाच वाजले होते अंधार पडायच्या आत मुक्कामी ठिकाणी सुरक्षित पोहचणे महत्वाचे होते. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरतांना चांगलीच पंचायत होत होती. आपण वर कसे आलो हेही कळत नव्हते. ७० ते ८० कोणातील उतरण होती. थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. शेवटी एका झाडाला दोर बांधून त्याचा साहाय्याने एक मोठा रॉक पॅच उतरलो.
आमच्या इतर खाली थांबलेल्या मंडळींनी आडराई मधील पाण्याच्या ठिकाणी मुक्कामाची जागा शोधली होती. या ठिकाणी पाण्याचा निर्मळ झरा वाहतो. खडकावरच पथाऱ्या मांडल्या गेल्या. जसा अंधार पडायला सुरुवात झाली तशी थंडी पडायला सुरुवात झाली शेकोटी पेटवली गेली. येथे विपुल प्रमाणात झाडे असल्याने सरपणाला तोटा नव्हता. फक्कड चहा बनवला गेला. माळशेज घाटातून जाणाऱ्या गाड्यांचा लाईट मुळे नागमोडी वळण उजळून निघत होता. जणू दिवाळीत टांगलेल्या दिव्यांच्या माळा दिसत होत्या. इतका मोठा नजारा या अगोदर कधी पाहिला नव्हता.
दगडाच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालू झाली . गप्पांची मैफल जमली होती. अचानक काळे ढग जमायला सुरुवात झाली पौर्णिमेचा चंद्र झाकोळला गेला. एक दोन थेंब अंगावर पडले . आत्ता जर पाऊस आला तर काय हाल होतील याचा विचार करू लागलो. पण देवालाच काळजी... जोरदार हवा सुटली व ढग दूर सारले गेले. स्वयंपाक होई पर्यंत माळशेज घाटातील गाड्यांचा लाईटचा ट्रेल चा फोटो काढायला जागा शोधत फिरत होतो. स्लो शटर स्पीड वर फोटो काढायचा होता पण ट्रायपॉड आणलेला नव्हता . शेवटी एक मोठा दगड सापडला त्याच्या वर कॅमेरा ठेऊन काही long exposer चे शॉट क्लीक केले.
![]() |
| माळशेज घाटातील गाड्यांची रोषणाई |
गाढ झोपेत असतांना पुण्याहून आलेल्या ग्रुपने जंगलात आग लागली उठा... उठा... आग विझवा... म्हणून आरडा ओरड चालू केली . तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते.
बरेच जण खडबडून जागे झाले . जंगलात आग लागलेली दिसत होती . ती आग कशी विझवायची हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. तेथे पाण्याचा साठा मुबकल नव्हता . आजू बाजुचे गवत वाळलेले होते आग पसरली तर बाका प्रसंग उभा राहील याची जाणीव झाली. शूज घालून बरेच जण सज्ज झाले. आमच्या कडे पाणी टाकायला कोणतेही साधन नव्हते. म्हणून आमच्या वाटाड्या कमळूला जोर जोरात आवाज दिला . ज्या बाजूला आग लागलेली दिसत होती तिकडूनच त्याचा आवाज आला. त्याला आग लागली आहे का ? असे विचारले असता तोच मोठी शेकोटी पेटवून झोपला होता असे लक्षात आले.
हे ऐकून जीव भांड्यात पडला पण झोपेचे खोबरे झाले होते. चंद्राचा टिपूर प्रकाशात सर्व परिसर जणू न्हाऊन निघाला होता. रात्र आहे की दिवस असा प्रश्न पडावा इतका सारा परिसर उजळून निघाला होता. शहरात आपल्याला असे क्षण नशिबी नसतात . ते उपभोगायचे असतील तर डोंगर , दऱ्या , निसर्गा तच यावे लागते . जेथे कोणताही कृत्रिम प्रकाश नसेल तेथे ...
हा देखावा बघून मन तृप्त झाले. थकव्यामुळे झोप पण येत होती, थंडीनेही उचल खाल्ली स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला कोंबून पुन्हा एकदा निद्रा देवीच्या स्वाधीन झालो.
- दिलीप गिते (7020100445)
- क्रमशः
![]() |
| रोहिदास च्या दिशेने वाटचाल |
![]() |
| माकड नाळ |
![]() |
| Sun shower बाथ |
![]() |
| रोहिदास वरून दिसणारा , कोकण कडा, सीतेचा डोंगर |
![]() |
| रोहिदास शिखर |
![]() |
| जय गिरिदुर्ग , जय शिवराय ! |













अप्रतिम
उत्तर द्याहटवासर खूपच अप्रतिम लिखाण केले तुम्ही...🙏
हटवाखुप सुंदर वर्णन मामा, सुरेख शब्दांकन!!
उत्तर द्याहटवातुमच्या सारखा लिहिण्याचा प्रयत्न करतोय
हटवाखूप छान मामा, रात्रीची गडबड आठवली आतल्या मजा वाटते पण त्यावेळी काही क्षण खूप भीती वाटली होती
उत्तर द्याहटवाथ्रिलिंग अनुभव होता
हटवाक्या बात है.... फक्कड.... आम्ही ट्रेक मिस केला 😥
उत्तर द्याहटवातुम्ही आत्ता आम्हाला सापडत नाही.
हटवाखूपच छान आणि सविस्तर
उत्तर द्याहटवाThank you !
हटवारोमांचकारी वर्णन
उत्तर द्याहटवाखरे तर ट्रेक रोमांचकारी च होता
हटवाkhupach chhan mama,
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन सर
हटवासखोल व अप्रतिम माहिती. भविष्यात इतर ट्रेकर्सला मार्गदर्शक ठरेल.
उत्तर द्याहटवामी व इतर 6 मित्रांनी 2002 मध्ये नागफणा पायथ्या पर्यंत हा ट्रेक केला होता. नळीची वाट येऊन काळू नदीला किंवा माकडनाळ वाटेला मिळते तेथील धबधब्यात मनसोक्त डुंबलो होतो.
धन्यवाद !
हटवाअप्रतिम लिखाण
उत्तर द्याहटवासर खूपच अप्रतिम लिखाण केले तुम्ही.🙏
उत्तर द्याहटवा